श्री क्षेत्र महाबळेश्वर
१८६०
स्कंदपुराणामध्ये महाबलक्षेत्रमाहात्म्यवर्णन अध्यायात या
क्षेत्राचा उल्लेख आढळतो.
पद्मकल्पामध्ये महाबळ आणि अतिबळ असे दोन राक्षस
भाऊ होऊन गेले.
अतिशय प्रभावी अशा या राक्षसांनी सृष्टीचा विध्वंस
चालू केला होता. तेंव्हा ब्रह्मा, विष्णू आणि शंकर
त्यांच्याशी युद्ध करण्यास सरसावले.
भगवान विष्णूने आपल्या सामर्थ्याने अतिबळाचा वध केला.
आपल्या धाकट्या भावाचा मृत्यू पाहून क्रोधीत झालेला
महाबळ देवांवर धावून आला.
त्याच्या क्रोधाला देवसुद्धा सामोरे जाऊ शकले नाहीत. मग
ते आदिमायेला शरण गेले आणि तिची स्तुती करण्यास
सुरुवात केली. खुश झालेल्या आदिमायेकडे त्यांनी
महाबळाचा अहंकार नष्ट करण्याची आणि त्याला
युद्धापासून परावृत्त करण्याची विनंती केली. आदिमायेच्या
शक्तीने महाबळ युद्धापासून परावृत्त झाला.
त्रीदेवांना म्हणाला तुमची काय इच्छा आहे ते सांगा,
निसंकोच मी पूर्ण करेन.
तेंव्हा त्रिदेव म्हणाले कि आमच्या हातून मारला जाऊन
आमचे इच्छित कार्य साद्ध्य कर.
महाबळ म्हणाला साक्षात त्रिदेवांच्या हातून मृत्यू येणे
म्हणजे वर मिळण्यापेक्षा महान आहे. आणि त्याने
त्रीदेवांना आपल्याला मारायला आवाहन केले.
तेंव्हा ब्रम्हदेव त्याच्या पायाशी ,विष्णू त्याच्या
गळ्याजवळ व शंकर त्याच्या डोक्याजवळ उभे राहिले आणि
वर देण्यास सिद्ध झाले.
महाबळ म्हणाला, हे शंकरा तू माझ्या नावाने इथे वास्तव्य
करावेस, हे नारायणा तू माझ्या भावाच्या नावाने
सह्याद्रीच्या शिखरावर रहावेस आणि हे ब्रह्मदेवा माझ्या
कोट्यावधी सैनिकांचा कोटीश म्हणून तू इथे रहा.
अशाप्रकारे महाबळेश्वर,अतिबलेश्वर व कोटीश्वर हे पृथ्वीवर
प्रसिद्ध झाले.
पंचगंगा उगम-
ब्रह्मारण्यमध्ये ब्रह्मदेवाने यज्ञ मंडप साध्य केला आणि
सिद्ध, साध्य, मुनी ,यक्ष, ऋषी व देवांना बोलावले.
महाबळेश्वर, अतिबलेश्वर आणि कोटेश्वर अशा लिंगांचे पूजन
करून यज्ञास प्रारंभ केला. सावित्री शृंगार करण्यामध्ये
मग्न असल्यामुळे मुहूर्त टळण्याची वेळ आली होती. तेंव्हा
यावर उपाय म्हणून विष्णू म्हणाले ज्येष्ठ व कनिष्ठ अशा
दोन भार्या सुखाकरीता व धर्मरक्षणासाठी असतात.
ज्येष्ठ भार्या काही संकटामुळे येणे शक्य नसेल तर कनिष्ठ
भार्येलाही धर्माचा अधिकार आहे. यज्ञाचा मुहूर्त टाळणे
बरे नाही. म्हणून गायत्री ताबडतोब येऊ दे. सावित्रीला
राग आला तर आम्ही त्यावर इलाज करण्यास समर्थ आहोत.
विष्णू सोबत जशी लक्ष्मी शोभून दिसते तशी गायत्री
शोभून दिसत होती.
यज्ञास सुरुवात झाली. इकडे सावित्री अजूनही
आमंत्रणाची वाट बघत होती.
ब्रह्मा आणि गायत्रीला अग्निस्थापना करुन
यज्ञमण्डपातून येताना पाहून क्रोधीत झालेल्या
सावित्रीने सर्व देवांना शाप दिला. धर्मपत्नी असलेल्या
मला टाकून ज्या जडबुद्धीने तुम्ही हे काम केलेत त्याअर्थी
तुम्ही जड होवोत.
ब्रम्हा,विष्णू व महेश यांनी ज्याअर्थी यशस्वी अशा
माझ्याकडे दुर्लक्ष करुन त्यांनी धर्माचा अतिक्रम केला
त्याअर्थी ते जलरूप होतील. व त्यांनी अधर्माने
माझ्यास्थानी गायत्रीला स्थान देण्याचा पक्षपात केला
म्हणून त्यांना स्त्रीनामे प्राप्त होतील व गायत्रीचे
दर्शनही कोणाला होणार नाही सर्व सभास्थानी असलेले
देव नदिरूप होतील व महासभ्य असलेल्या विष्णू देखील
नदिरूप होवो.
भगवान श्रीविष्णू म्हणाले,जी पतीच्या आज्ञेचा उपमर्द
करुन स्वतःमान मिळविण्याचा प्रयत्न करते तिची
धर्मपत्नी म्हणून प्रसिद्धी कशी होईल? धर्ममर्यादांचे
पालन करण्याकरिता यज्ञरूप व्रत चालू असता तुझी
शृंगाराची हौस कशासाठी? यज्ञसामग्री तयार होती व
मुहूर्तही टाळण्याच्या बेतात होता, म्हणून मी हे संकट
टाळण्यासाठी गायत्रीला बोलवावयास सांगितले. तेंव्हा
यज्ञास आरंभ केल्याने तुझे काय बिघडले? शिवाय उरलेला
यज्ञ तुझ्याकडूनच समाप्त होईल असा विचार करण्याचे
सोडून तू विनाकारण शाप दिलास म्हणून तू जलरूप होऊन
पश्चिम सागरास मिळशील. एकमेकांनी अशाप्रकारे शाप
दिल्याने सावित्री व देव या दोघांवर संकट प्राप्त झाले.
तेंव्हा तू देखील नदिरूप हो असे भगवान विष्णू म्हणाले.
सर्व देव आपली शापापासून मुक्तता व्हावी म्हणून
सावित्रीची प्रार्थना करू लागले. सावित्रीने सर्व देवांना
असा उःशाप दिला की ज्याचा कृष्णा नदीशी संगम होईल
तो देव तेव्हापासून जलरुपापासून मुक्त होऊन पुनः देवरूप
होईल.
कृष्णा विष्णूरूप झाली वेण्णा शिवरूप झाली व ब्रम्हदेवाने
कोयनेचे रूप धारण केले. गायत्री व सावित्री मात्र
आपापल्या रुपातच राहिल्या.
इतिहासात महाबळेश्वरचे मंदिर, दौलताबादचे राजे यादवराजे
सिंघन यांनी १३व्या शतकात बांधले.१६व्या शतकात
जावळीचे चंद्रराव मोरे यांनी मंदिराचा जिर्णोद्धार केला
या नंतर शिवरायांनी मंदिराचा विस्तार केला. १७०८ ते ४९
या काळात शाहुराजांनी मंदिराची सुधारणा केली.
No comments:
Post a Comment