दैवी संपदा लाभलेली झाडे....
लेखक:- अॅड. अंकुश सू. नवघरे. (पालघर)
(ज्योतिष विशारद)
पुनः प्रकाशन:- दि.१६.११.२०१८
©Ankush S. Navghare ®२०१८
(ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला काही अशा झाडांबद्दल (झाडांपासून मिळणाऱ्या फळे, फुले, मूळ) माहिती सांगणार आहे ती घरात किंवा घरासमोर लावली असता किंवा त्या पासून मिळणाऱ्या वस्तू घरात ठेवल्या असता घरात कुठल्याही अशुभ शक्तींचा किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश सहजासहजी होत नाही किंवा अजिबातच होत नाही. तसेच ह्या झाडांच्या नुसत्या सानिध्याने आपले रक्षण होते किंवा त्यांच्या औषधी गुणधर्मामुळे आपले काही आजारही बरे होऊ शकतात.
१. तुळस:- आपल्या देशात तुळस ह्या झाडाला खूपच पवित्र मानले जाते आणि रोज त्याची पूजा केली जाते. एखाद्या घरात तुळस नाही असे कुठेच दिसून येत नाही. तुळशीची पाने भगवान श्री विष्णूंना खूप प्रिय आहेत. ज्या घराच्या दारासमोर किंवा घरात ईशान्य दिशेला तुळशीचे रोप लावलेले असते त्या घरात कधीच अशुभ किंवा नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही, किंवा करू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या घरात तुळस लावावी असे प्राचीन शास्त्रात पण लिहिले आहे. असे म्हणतात की ज्या ठिकाणी तुळस लावली जात नाही तिथे आशा शक्ती सहज प्रवेश करू शकतात आणि मग त्याच्या प्रभावाने घरात आजार, भांडणे इत्यादी आणू शकतात. मी काही घरी अशी पहिली आहेत की तिथे तुळस अजिबात जगत नाही अशा ठिकाणी जमिनीत किंवा वास्तूत नक्कीच काहीतरी दोष असतोच असतो. घरात वास्तू दोष आहे की नाही किंवा घरात काही अशुभ आहे की नाही हे पाहण्याकरिता घरात तुळस लावावी. ज्या घरात तुळस चांगली वाढत असेल तिथे सर्व मंगल असते.
२. लाजाळू:- लाजाळू चे रोप हे शक्यतो शेतात किंवा शेताच्या बांधावर उगवते किंवा क्वचितच रस्त्याच्या कडेला उगवलेले दिसते. लाजाळू च्या पानांना हात लावला असता ती पाने मिटायला सुरवात होते म्हणूनच तिला लाजाळू असे गमतीने म्हटले जाते. त्यात वरून खाली मिटणारी पाने आणि खालून वर मिटणारी पाने असा प्रकार असतो आणि त्यावरूनच लाजळूचे महत्व कमीजास्त होत असते. हे सर्व असले तरी लाजाळू च्या झाडात प्रचंड दैवी शक्ती आहे. ज्या घरात लाजळूचे झाड असते तेथे कधीच अशुभ शक्ती प्रवेश करू शकत नाहीत तसेच घराला सुब्बत्ता येते. ज्यांचे सहजासहजी ध्यान लागत नाही त्यांनी लाजळूची काही पाने आपल्या असनाखाली ठेऊन ध्यान केले असता ते जलद लागू शकते किंवा गाढ लागू शकते. लक्ष्मी प्राप्तीसाठी लाजळूची पाने तिजोरीत ठेवावीत.
३. बेल:- भगवान शंकरांना अत्यंत प्रिय असल्याने बेलाची पाने खूपच प्रसिद्ध आहेत. बेल हा एक खूप मोठा वाढणारा वृक्ष आहे तरीही सुरवातीच्या काळात त्याचे रोप तुम्ही कुंडीत लावू शकता. ज्योतिष शास्त्रानुसार बेलाच्या झाडाची सेवा केल्यामुळे भगवान श्री शंकराची सेवा घडत असते आणि त्यांचे सर्व भूत, प्रेत, गण, अशुभ शक्ती ह्यांच्यावर अधिपती असल्याने त्या शक्तींचे कारक ग्रह, राहू आणि केतूच्या अशुभ प्रभावामुळे आपण वाचू शकतो. राहू आणि केतू ह्याच ग्रहांच्या पत्रिकेतील स्थितीवरून आपल्यावर बाहेरची बाधा होऊ शकते की नाही हे कळू शकते. परंतु, जर घरात बेलाचे झाड लावले आणि रोज त्याची सेवा केली तर राहू आणि केतू ह्या ग्रहांची सेवा घडून त्यापासून होणाऱ्या संभाव्य बाधा टळू शकतात. हे झाड शक्यतो आग्नेय दिशेला लावलेले चांगले असते. बेलाच्या फळाच्या गराचे सरबत पोटदुखी, मुरडा इत्यादींवर खूप गुणकारी असते. बेलाची पाने चावून खाल्ल्याने दात बळकट होतात तसेच दाताला एक प्रकारचे तेज प्राप्त होऊन बोलताना लोकांवर त्याचा संमोहनासारखा प्रभाव पडून तुमची पैशाची कामे जलदगतीने होऊ शकतात. एक गुप्त प्रयोग असा आहे की बेलाच्या पणाला एक ४×४ आकाराच्या पांढऱ्या कागदावर मध्यभागी चिकटऊन त्यावर त्राटक केले असता तुमच्यावर होणारे करणी प्रयोग समोरच्यावरच उलटतात. सर्वांनी असा गुणकारी वृक्ष लावून स्वतःचे जीवन सुखी करून घेणे.
४. ब्राम्हकमळ:- ब्राम्हकामळाचे झाड खुपच पवित्र मानले जाते. जेथे ब्रम्हकमळाचे झाड लावले जाते ती जागा खूप पवित्र असावी लागते अन्यथा त्याला फुले येत नाहीत व त्याची वाढ होत नाही. घरात वास्तुदोष किंवा काही अशुभ शक्तींचा वावर आहे की नाही हे पाहण्यासाठी ह्या झाडाचा उपयोग होऊ शकतो. जर घरात काही दोष किंवा तसेच काही असेल तर ह्याची पाने काळी पडू लागतात किंवा खराब होऊ शकतात. ज्या दिवसापासून तुमच्या घरातील ब्राम्हकमळाच्या झाडाची पाने खराब होऊ लागतील तेव्हा निश्चितच घरात काहीतरी समस्या निर्माण झाली आहे असे समजावे.
५. रुद्राक्ष:- रुद्राक्ष तर सर्वांना माहीत आहेच. रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान श्री शंकरांच्या अश्रूंतून झाली आहे अशी आख्यायिका आहे. श्री गुरुचरित्रात असे म्हटले आहे की एक सहस्त्र रुद्राक्ष धारण करणारा मनुष्य साक्षात शिवासमान असतो. रुद्राक्षचे एकूण २१ प्रकार असतात. त्यांच्यावर असणारी रेष हे त्यांचे वेगळे पण स्पष्ट करते. त्यात १ मुखी आणि २१ मुखी रुद्राक्ष हे खूपच प्रभावी मानले जातात परंतु ते मिळण्यासाठी खूपच भाग्य लागते किंवा पैसे लागतात. सध्या बाजारात मिळणाऱ्या रुद्राक्षांपैकी ५ मुख असणारे रुद्राक्ष हे खरे असून बाकी सर्व नकली मिळत असतात. ५ मुखी रुद्राक्ष हे सहज उपलब्द्ध होतात. गळ्यात रुद्राक्ष धारण करणाऱ्याच्या मागे कुठलीही वाईट शक्ती लागत नाही. अशुभ शक्ती आशा माणसापासून लांब राहते. म्हणूंन प्रत्येकाने किमान एक रुद्राक्ष तरी धारण करावा. रुद्राक्ष हृदयाच्या इथे धारण केल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो तसेच रुद्राक्ष पाण्यात भिजत घालून ते पाणी सकाळी अनाशे पोटी प्यायल्याने तुमचे निद्रानाश, इत्यादि मानसिक आजार बरे होऊ शकतात.
६. कोरफड:- ह्या झाडाला इंग्रजीमध्ये alovera असे म्हटले जाते. कोरफळीत नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची खूप मोठी शक्ती आहे. कोणाला नजर लागली असता त्याच्यावरून कोरफड ७ वेळा उतरवून कचऱ्यात टाकली असता नजरदोष जातो, त्यासाठी वेगळ्या मंत्राची आवश्यकता नसते. कोरफळीच्या झाडाला जास्त पाण्याची आवश्यकता नसते त्यामुळे ते झाड हवेवर पण खूप दिवस जगू शकते म्हणून कोरफळीचे लहानसे रोप तुम्ही घराच्या दाराच्या चौकटीला वरच्या भागाला बांधले तर घरात अशुभ शक्ती प्रवेश करू शकत नाहीत. कोरफळ लक्ष्मीप्राप्तीच्या कामात पण उपयोगी पडू शकते.
७. कोहळा:- कोहळा ही भोपळ्यासारखी दिसणारी एक वनस्पती आहे. कोहळ्या मध्ये तीव्र प्रकारच्या नारारात्मक शक्ती, नजर आणि अशुभ शक्ती खेचून घेण्याची शक्ती असते. कोकणासारख्या गावांमध्ये तुम्हाला घरोघरी कोहळे बांधलेले आढळून येतील. कोहळा घरात पण बांधता येतो. ज्यावेळी नजरेचे प्रमाण वाढते त्यावेळी कोहळ्यातून पाणी ठिबकू लागते अशावेळी त्या कोहळ्याचे विसर्जन करून त्याजागी नवीन कोहळा बांधावा. अशाप्रकारे बदललेल्या कोहळ्यातून जेव्हा पाणी ठिबकायचे बंद होईल तेव्हा घरातल नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे गेली असे समजावे.
८. लिंबू:- लिंबाबद्दल तर सर्वानाच माहीत आहे. सर्व प्रकारच्या तांत्रिक आणि मांत्रिक कामात लिंबाचा आवर्जून वापर होत असतो करण लिंबामध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा खेचण्याची ताकद आहे. असे म्हणतात की तंत्रात १००० बोकडांचा बळी हा १ रेड्याच्या बळी सारखा असतो, १००० रेड्यांचा बळी हा १ माणसाच्या बळी सारखा असतो आणि १००० माणसांचा बळी हा एक लिंबू कापण्यासारखा असतो. म्हणूंन कुठल्याही प्राण्यांचा बळी देण्यापेक्षा एक लिंबू कापणे हे जास्त प्रभावी मानले जाते. लिंबाचे झाड घरात किंवा घराच्या आवारात लावणे खूप शुभ मानले गेलेले आहे. लिंबाचा एक टोटका असा आहे की, एक लिंबू घेऊन तो काचेच्या ग्लास मध्ये पाण्यात बुडता ठेऊन तो ग्लास घरात सर्वाना दिसेल असा ठेवल्याने घरात येणाऱ्या सर्वांच्या वाईट नजरा तो शोषून घेतो आणि त्यापासून घरच्यांची सुरक्षा करतो. तो लिंबू खराब झाल्यावर त्याजागी नवीन लिंबू ठेवावा.
९. काळी हळद:- हळदीचे काही प्रकार आहेत त्यात काळी हळद हा एक प्रकार आहे. मार्केट मध्ये काळ्या हळदीच्या नावाने काहीपण दिले जाते आणि पैशे उकळले जातात त्यापासून लांब राहणे. काळी हळद वशीकरण, कोर्ट केसेस मध्ये विजय, राजकारण मध्ये विजय, भूत बाधेपासून सुटका करून घेण्यासाठी तसेच लक्ष्मी प्राप्ती साठी उपयोगात आणली जाते. हळदीचे ७ प्रकार आहेत त्यात एक प्रकार काळी हळद म्हणून प्रचलित आहे.
हळदीचे ७ प्रकार....
१. पांढरी हळद... ही आतून पांढऱ्या रंगाची असते आणि इतर हळदीच्या जोडीला ही वापरतात.
२. जांभळी... हीचे मूळ आतून जांभळे असते आणि पानावर जांभळा पट्टा म्हणजे रेष आलेली असते.
३. कुकवी... ही कुंकवासारखी लालसर असते. हिची ओळख म्हणजे हिच्या मुळाने कागदावर रेष मारली असता लाल रेष उमटते. हि खूप शक्तिशाली मानली जाते. हि धनप्राप्ती साठी पण वापरली जाते.
४. पिवळी... हि आतून पिवळी असते. हि वाशिकरणासाठी वापरली जाते.
५. शेंदरी... हि आतून शेंदरा सारखी असते. हि पतिपत्नी मध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी वापरता येऊ शकते.
६. काळी.. हि सर्वात शक्तिशाली हळद असते. हि खूपच दुर्लभ असून खूप खोल जंगलातच मिळू शकते. हिचे ५० ते १०० ग्राम वजनाचे मूळ ५० लाखाच्या आसपास जाऊ शकते. आणि ज्याच्या नशिबात असेल त्यालाच ती मिळू शकते. हिच्या आसपास रक्षण करण्यासाठी/ किंवा विशिष्ट वासामुळे कोब्रा नाग असतात. हिची ओळख पटवणे आणि हिला काढणे ह्याचे काही प्रकार आहेत ते मी नंतर कधीतरी सांगेन.
७. साधी हळद... हि जेवणात वापरली जाते.
काळी हळद हि एक प्रकारची संजीवनी बुटी सारखी असते ज्यात दैवी गुण समावण्याची शक्ती आहे. बहुतेक सर्व संजीवन बुटी ह्या हिमालयात मिळतात. मग प्रश्न असा पडतो की महाराष्ट्रात काळी हळद कशी आली किंवा काही औषधी वनस्पती कशा आल्या तर त्याची एक आख्यायिका जी मी काही जाणकारांकडून ऐकली आहे ती शेयर करत आहे.
....ज्यांनी कोणी रामायण पाहिल वाचलं असेल त्यांना हे माहीतच असेल की ज्यावेळी श्री राम आणि लक्ष्मण वर रावणाचा मुलगा इंद्रजित एक शक्ती प्रयोग करतो त्यावेळी ते दोघेही बेशुद्ध होतात. त्यावेळी श्री हनुमान रावणाच्या वैद्या ला उचलून घेऊन येतात. तेव्हा रावणाचा वैद्य सांगतो की ह्यांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला संजीवन बुटी ची आवश्यकता आहे आणि ती फक्त हिमालयात द्रोणागिरी पर्वतावर उपलब्ध आहे. हे ऐकून श्री हनुमान द्रोणागिरी पर्वतावर जातात परंतु त्यांना तिकडे नक्की संजीवनी बुटी कुठली ह्याची ओळख पटत नाही म्हणून ते पूर्ण पर्वतच उचलून आणतात. तो पर्वत आणत असताना श्री रामाचे भाऊ भरत त्यांना बाण मारतात आणि त्यामुळे तो पर्वत आणि ते दोघेही खाली पडतात अशी आख्यायिका आहे.
....तो पर्वत आणत असताना त्या पर्वताचा काही भाग तुटून खाली पडतो तो भाग म्हणजे आत्ताच नाशिक बाजूचा सप्तश्रुंगी देवीच्या गडावरील वणी या क्षेत्राचा डोंगर. त्याचप्रमाणे वसई येथील तुंगारेश्वर चा डोंगर आणि पालघर येथील काळदुर्ग तसेच इतर काही डोंगरांवर थोड्याफार प्रमाणात त्या संजीवनी बुटी पडल्या आणि त्यांची वाढ होत राहिली. त्यापैकी वणी चा डोंगर खूपच सिद्ध आहे आणि तिथे खूपच जाडीबुटी आहेत.
काळ्या हळदीचा उपयोग कसा करून घ्यावा...
१. काळ्या हळदीचे रोप असलेली कुंडी तुमच्या ऑफिस मध्ये किंवा दुकानाच्या दरवाजा बाहेर ठेवली असता व्यवसायात कमालीची वाढ होते. आमच्या येथे मी तुम्हाला अशी कित्येक दुकाने दाखवू शकतो त्याच्यासमोर अशा कुंड्या ठेवल्या आहेत.
२. घराच्या बागेत ह्याची रोपे लावल्याने घरात समृद्धी येते. काळ्या हळदीच्या पानाचा रस प्यायल्याने ३ दिवस पर्यंत तहान भूक लागत नाही. त्यामुळे साधू इत्यादी त्याचा उपयोग करताना आढळतात.
३. काळ्या किंवा इतर हळदीचा जरासा नखाएवढा तुकडा तोंडात ठेऊन तुम्ही ज्याच्याशी बोलता तो तुमच्यावर मोहित होतो आणि तुमची शासकीय किंवा इतर काही कामे सहजपणे होऊ शकतात. तसेच पैशाची कामे किंवा कोणाला कर्जाऊ दिलेली रक्कम सहजपणे परत मिळू शकते.
४. रोज काळ्या हळदीचे किंवा इतर त्याच प्रकारातील हळदीचे सेवन केल्याने माणसाच्या बोलण्यात एक प्रकारची वाचा शक्ती निर्माण होते.
५. हळदीचे पान असनाखाली ठेऊन ध्यान केले असता ते पटकन लागते कारण ह्या प्रकारच्या झाडांमध्ये विचार संक्रमाणाची आणि विचार ग्रहणाची जबरदस्त शक्ती असते. ज्या प्रमाणे व्याघ्रसनावर बसून माणसाचे सहज ध्यान केंद्रीत होते त्याच प्रमाणे ह्याच्या पानांचा उपयोग असनाखाली केला असता सहज योग प्राप्त होऊ शकतो.
६. अशा प्रकारच्या हळदीचा एक गोल तुकडा कापून त्यावर त्राटाक केले असता तुमच्या वर केले गेलेले करणी प्रयोग (Phychic Attack) त्या माणसावरच उलटू शकतात.
७. रोज ह्या प्रकारच्या हळदीची मनोभावे पूजा करून तिला तुळशी प्रमाणेच धूप दीप दाखवल्याने आपल्या मनोकामना ६ महिने ते १ वर्षांत पूर्ण झाल्याचे कित्येक लोकांचे अनुभव आहेत.
८. काळ्या हळदीचे किंवा त्याच प्रकारच्या इतर हळदीचे लहान तुकडे किंवा छोटी रोपे घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात परंतु दक्षिण दिशा सोडून लावले असता त्या त्या दिशेचा वास्तुदोष जातो. जसे नैवृत्त कोपऱ्यात लावले असता घरात एकोपा निर्माण होतो व घरातलयांशी संबंध सुधारतात. दारासमोर लावले असता अशुभ शक्ती घरात शिरत नाहीत, इत्यादी.
१०. नारळ:-
.....नारळ माहिती नाही असा एकही माणूस ह्या जगात मिळणार नाही, परंतु आपल्या देशात नारळाला खूपच महत्व प्राप्त झालेले आहे. नारळाला माणसासारखे मानले जाते करण नारळाला २ डोळे आणि एक शेंडी असल्याने नारळाला ब्राम्हण मानले जाते आणि कुठल्याही सात्विक पूजा कार्यात नारळाची स्थापना केली जाते. कुठलेही पूजा, कर्म, श्राद्ध किंवा कुठलेही कार्य नारळाशिवाय पूर्णच नाही होऊ शकत. अशा ह्या नारळात एखादी वाईट किंवा अशुभ शक्ती अडविण्याची प्रचंड ताकद आहे. तुम्ही घरोघरी पाहिले असेल की देव्हाऱ्यात कर्यावर म्हा आहे तांब्याच्या तांब्यावर नारळ ठेवलेला असतो आणि त्याखाली पाणी ठेवलेले असते किंवा कित्येकांच्या घराच्या आढयाला लाल किंवा पिवळ्या कपड्यांत नारळ टांगलेला असतो तर ते का. त्या मागे एक शास्त्रीय कारणही आहे ते म्हणजे आकाश तत्व. इतर कुठलेही फळ, कुठलीही गोष्ट सोडलीत तर फक्त नारळातच पंचमहाभूतांतील सर्वच तत्व सम प्रमाणात एकटवली गेलेली आहेत. त्यात आकाश तत्व हे जास्त प्रमाणात आहे. अगदी मानवी शरीरापेक्षाही जास्त आकाश तत्व नारळात एकटवलेले आहे आणि सृष्टी च्या नियमाप्रमाणे कुठलीही शक्ती ही नाशानंतर आकाषश तत्वाकडेच खेचली जाते. जसे मनुष्याचा आत्मा देहाच्या मृत्यूनंतर सुर्यलोकत म्हणजे आकाशातच जात असतो. ह्याच कारणांमुळे ह्या जगातील सर्वच शुभ, अशुभ आणि नकारात्मक शक्तीही नारळाकडेच सहजरित्या आकर्षित होत असतात आणि म्हणून कुठलीही शक्ती घरात पासरण्या आधी ती नारळात खेचली जाऊन आकाशाकडे परावर्तित केली जाते किंवा आतल्या जलतत्वा मध्ये विलीन केली जाते. कुठलाही उतारा किंवा अस्थींचे विसर्जन जलात करतात कारण फक्त जल तत्वातच त्याचे विघटन करण्याची शक्ती आहे आणि ती नारळामध्ये निसर्गतः आहे. तुम्ही पाहिले असेलच की देवाला नारळ अर्पण करताना त्याची शेंडीकडची बाजू देवाकडे ठेऊन मग तो फोडून प्रसाद म्हणून दिला जातो कारण त्या शेंडीतूनच कुठलीही शक्ती नारळात खेचली जाऊन त्यात कैद होत असते. तशीच ईश्वरी शक्ती त्यात खेचली जाऊन त्यातील पाण्यात विरघळते आणि म्हणूनच ते पाणी तीर्थ म्हणून आणि खोबर प्रसाद म्हणूंन वाटला जातो. नारळाला देवघरात कर्यावर ठेवण्याचे कारण म्हणजे तुम्ही हे ऐकलेच असेल की कोणावर ही करणी करण्या आधी त्याच्या देवांना बंधन आणले जाते, त्याचप्रमाणे कुठलीही अशुभ शक्ती आधी आपल्या देवावर किंवा कुलदैवतावर हल्ला करते आणि त्याला निष्प्रभ करून आपल्याला मिळणारे देवांचे सहाय कमी करते त्यानंतर मग ती शक्ती आपल्या घरावर हल्ला करते परंतु नारळाच्या अस्तित्वामुळे ती त्याच्यात खेचली जाऊन आपल्या देवाना त्याची झळ पोहोचत नाही आणि आपलेही रक्षण होते. कर्यात पाणी ठेवण्यामागचे कारण म्हणजे कधी कधी नारळ सुकलेला असू शकतो किंवा खराब झालेला असू शकतो तेव्हा हीच शक्ती कार्यतील पाण्यात उतरते आणि आपले रक्षण होते.
असा हा दैवी संपदा लाभलेला नारळ सर्वांनी आपल्या घरातील देव्हाऱ्यात किंवा देव्हारा ईशान्य भागात नसेल तर ईशान्य कोपऱ्यात ठेऊन आपले आणि आपल्या घराचे रक्षण करावे ह्याबाबत मी स्वतः अनुभवलेला प्रसंग असा आहे की, माझ्याकडे एक केस आली होती की एक माणसावर कदाचित करणी प्रयोग झाला असावा, त्या माणसाला अचानक सतत रक्ताच्या आणि पाण्याच्या उलट्या सुरू झाल्या होत्या, त्या लोकांना ह्या सर्वांवर विश्वास नसल्याने त्याच्या नातेवाईकानी त्या माणसाला हॉस्पिटल ला ऍडमिट केले होते परंतु नक्की काय झालंय ह्याचे निदान न झाल्यामुळे केस खूपच सिरीयस झाल्याने डॉक्टरांनी त्यांचे हात वर केले होते व त्याला घरी घेऊन जाण्यास संगीतले होते पण सोबत एक चांगला डॉक्टर दिला होता. शेवटी नाईलाजाने म्हणून त्याच्या नातेवाईकांनी त्याला परत घरी हलवले होते. त्या माणसाच्या नातेवाईकांना कोणीतरी मला भेटण्यास सांगितले होते आणि म्हणून एक शेवटचा प्रयत्न म्हणून ते मला त्यांच्या घरी घेऊन आले होते. मी त्यांच्या घरी जाऊन घराची पाहणी करून त्यांना त्या माणसाच्या डोक्याशेजारी कर्यावर नारळ ठेवायला सांगितला, नारळ ठेवताना त्याच्यावर मी काही मला येत असलेल्या मंत्रांचे प्रोक्षण केले होते व आता काय होईल ह्याची वाट पाहत असताना तो नारळ अचानक फुटला म्हणून आम्ही परत दुसरा नारळ ठेवला तर तोही फुटला, असे करता करता जवळपास ६ नारळ फुटले आणि त्यानंतरचे ३ तडकले, त्यानंतर मात्र नारळ तडकला नाही त्याच वेळी त्या माणसाच्या उलट्या कमी कमी होऊन थांबल्या. म्हणून तिथे असलेल्या डॉक्टर ने परत त्याला तपासले आणि अंबुलन्स बोलावून घेतली आणि परत हॉस्पिटल ला ऍडमिट केले. काही दिवसांनी तो माणूस खणखणीत बरा झाला. म्हणूंन आजच सर्वांनी कर्यावर नारळ ठेऊन आपले जीवन सुखी करून घ्यावे.
आता हे सर्व कसं झाल, त्या नाराळामुळेच झाले असा कुठलाही दावा मी करत नाही परंतु ते सर्व असे होते की नाही हे कृपया वाचकांनीच ठरवायचे आहे.
११. सुपारी:-
....सुपारी ह्या वस्तूला आपल्या जीवनात खूपच महत्व आहे. मला सुपारीचे २ प्रकार माहीत आहेत जे मला उपयोगी आहेत. १ साधी सुपारी किंवा पांढरी सुपारी ही पूजापठात वापरली जाते आणि २ काळी सुपारी ही तंत्र कर्मात वापरली जाते. एखाद्याला सुपारी देणे म्हणजे वचन देणे. जस पूजापाठात सुपारीला महत्व आहे तसेच ते आपल्या आयुष्यात ही आहेच. कुठल्याही कामात सुपारी हा शब्द वापरला जातो. सुपारी दिल्यानंतर खऱ्या कामाला सुरुवात होते. अशा ह्या सुपारीला पूजापाठात पण खूपच महत्व आहे. प्रत्येक कार्यात देवाला मुखशुद्धी करिता सुपारी दिली जाते किंवा एखाद्या देवाची मूर्ती नसेल तर त्या सुपारीवर ही देवाचे आवाहन केले जाते. अशी ही सुपारी घराच्या दारात वचन घेऊन ठेवली असता घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाहीत. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जसे मी मागच्या भागात सांगितले तसे त्या ५ वस्तूंमध्ये सुपारीही ठेवली जाते. एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की कोणीही म्हणजे घरातल्या माणसांपैकी सोडून कोणीही तुम्हला सुपारी खायला दिली तर ती खाऊ नये कारण सुपारीत वाशिकरणाचीही खूप मोठी ताकद असते. सुपारी वाशिकरणाच्या विधीत कोणीही फक्त सुपारी खायला देऊन तुमच्याकडून कुठलेही काम करून घेऊ शकतो तुम्हाला फसवू शकतो. माता आणि भगिनींनी शक्यतो सुपारिपासून लांबच राहावे अन्यथा अनर्थ होऊ शकतो. अशी ही सुपारी तुम्ही तुमच्या आज्ञाचक्राच्या इथे लावून डोळे मिटून एकदम एकाग्रतेने आणि श्रद्धेने जर एखादा विचार त्या सुपारीत प्रोक्षित केला आणि ती सुपारी इच्छित व्यक्तीला खायला दिली तर मंत्राशिवायही तुमचे काम तुम्ही सहजगत्या करून घेऊ शकता, तसेच देवाला एखादा नवस घेताना तो सुपारी ठेऊन घेतला तर लगेच फलदायी ठरू शकतो. गावाकडे सुपारी चिकटवूनच कौल मागितला जातो. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की प्रत्येक अकॅशन ला रिअकॅशन ही असतेच म्हणूंन कुठलेही चांगलेवाईट काम करण्याआधी नीट विचार करूनच करा.
१२. नागवेलीचे पान:-
.....नागवेलीचे पान म्हणजेच खायचे पान. सुपारीनंतर नागवेलीची पाने पूजेसाठी वापरली जातात. नागवेलीच्या पानातही वाशिकरणाची खूप मोठी शक्ती असते. असे म्हणतात की कोणी पानाचा विडा आपल्याला खायला दिला तर खाऊ नये कारण पानाच्या विड्यात वशीकरण करण्याची खूप मोठी शक्ती आहे. तुम्ही जर का निरीक्षण करत असाल तर एक लक्षात येईल की नेहमीच घरोघरी फिरणारे विक्रेते काही न काही सुपारी किंवा पान तोंडात चघळत असतात आणि बोलत असतात त्यामुळे आपल्या मनावर एक प्रकारची धुंदी येऊन तो सांगेल त्या किमतीला आपण वस्तू विकत घेतो. परंतु ह्या वाशिकरणाचा परिणाम त्या स्त्रियांवर किंवा पुरुषांवर होऊ शकत नाही जे स्त्री, पुरुष कपाळावर तिलक लावतात किंवा टिकली लावतात. तर असे हे नागवेलीचे पानाचे झाड ही खूपच दैवी असते. भारतीय ज्योतिषशास्त्रा प्रमाणे नागवेलीचे झाड घरात कुंडीत लावले असता बुध ग्रहाची शांती होऊन त्यासंबधातील त्रास कमी होतात. ह्या झाडाची रोज पूजा केल्याने वाकचातुर्य प्राप्त होते. ह्या पानांचे काही तांत्रिक प्रयोग असे आहेत.
१. कुठल्याही महत्वाच्या कामासाठी बाहेर पडताना २ नागवेलीची पाने सोबत ठेवल्याने कामे व्यवस्तीत पार पाडतात कारण त्यांच्या उग्र वासाने अशुभ शक्ती कामात अडथळा आणत नाहीत.
२. भगवान शंकरांना खायचे पान अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात परंतु ते पान कापलेले इत्यादि नसावे.
३. कोणाला वाईट नजर लागली असता खायच्या पानात ७ गुलाबाची पाने टाकून ते खायला दिले असता सर्व नजरबाधा समाप्त होतात. ह्या पानात इतर वस्तू पैकी फक्त खोबर आणि बडीशेप टाकली तर चालू शकते.
४. शनिवारी ५ पिंपळाची पाने आणि ८ देठ असलेली विड्याची पाने लाल धाग्यात बांधून पूर्व दिशेकडे बांधल्याने व्यवसाय वाढतो. असे कमीतकमी ५ वेळा करणे गरजेचे असते आणि प्रत्येक वेळी जुनी पाने पाण्यात विसर्जन करावी.
५. रविवारी घराबाहेर पडताना खायचे पान सोबत घेऊन निघाल्याने सर्व अडलेली कामे पार पडतात.
मित्रांनो असे हे गुणकारी खायचे पान कित्येक आजारांवर उपयोगी आहे.
१. खायची पाने पाण्यात उकळवून ते पाणी प्यायल्याने कफ आणि खोकला होत नाही.
२. पान खाण्यामुळे पाचनशक्ती वाढते.
३. २ कप पाण्यात ५ खायची पाने उकळवून ते पाणी प्यायल्याने शरीराची दुर्गंध जाते.
४. तोंडातून किंवा हीरड्यांतून रक्त येत असल्यास २ पाने आणि १० ग्राम भीमसेनी कापूर चावून चावून खाल्ल्याने हा त्रास कमी होतो तसेच तोंडाला येणार दुर्गंध निघून जातो.
१३. लवंग:-
.....ज्याप्रमाणे पूजपाठात, तंत्रशास्त्रात लवंगला खूप महत्व आहे तसेच ते आयुर्वेदामध्येही आहे. दातदुखीत लवंग तोंडात धरले असता दात दुखी कमी होते, सुक्या खोकल्यामध्ये लवंग तोंडात धरले असता खोकल्याची उबग कमी होते, घसा खवखवणे कमी होते, १ लवंग टाकून दूध प्यायल्याने कामशक्ती वाढते इत्यादी अनेक औषधी उपयोग लावंगाचे आहेत आणि त्यांची लिस्ट करायला गेले तर एक पुस्तक लिहून होइल. त्याचप्रमाणे लवंगामध्ये असे काही गुप्त आणि दैवी गुण आहेत ज्यांचा वापर करून कोणीही मनुष्य रंकाचा राजा होऊ शकतो, आपले जीवन सफल करून घेऊ शकतो. काळे मीठ घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवल्याने त्याभागातली नकारात्मक ऊर्जा कमी होऊन वास्तुदोष कमी होण्यास मदत होते हे सर्वाना माहीत असेलच परंतु त्यात जर का एक दोन लवंग खोचून ठेवले तर वास्तुदोषच काय अशुभ शक्तीही असेल तर निघून जाते.
१. सकाळच्या आरतीत कापूर सोबत लवंग जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा जाऊन आपल्या साऱ्या इच्छा पूर्ण होतात.
२. लिंबू मध्ये ४ लवंगा टोचून हनुमान मंदिरात ठेऊन 3 वेळा हनुमान चाळीसा पठाण केल्याने सर्व अडलेली कामे होतात.
३. इंटरव्युला किंवा कुठल्याही महत्वाच्या कामासाठी बाहेर जाताना ५ लवंग पुडी करून जवळ बाळगले असता अशुभ शक्ती अपल्यापासून लांब जाऊन आपल्याला यशप्राप्ती होऊ शकते.
४. नवरात्री मध्ये देवीला लवंग वाहिल्याने आपली शक्यकोटीतील इच्छा पूर्ण होऊ शकते.
५. घराच्या मुख्य दरवाजासमोर लवंग ठेवल्याने त्याच्या वासाने घरात अशुभ शक्ती प्रवेश करत नाहीत.
६. कोणी तुम्हाला नाहक त्रास देत असेल, तुमची बदनामी करत असेल तर त्याच्या फोटोवर ३ लवंग ठेऊन त्याची पुडी करून त्या पुडीवर एक मोठा दगड ठेवल्याने ती व्यक्ती आपला मित्र बनते किंवा आपला मार्ग बदलते.
.. वरील दिलेल्या माहिती प्रमाणे तुम्ही त्याचा लाभ घ्यावा आणि आपले जीवन सुखकारक करून घ्यावे. तुमच्यापैकी कोणालाही ह्या माहितीपेक्षा अजून काही माहिती असेल तर कृपया मलाही सांगावे आणि माझे ज्ञान वाढवावे ही विनंती.
धन्यवाद...
अंकुश सू. नवघरे..
Desclaimer: सदरची माहिती ही स्वानुभवातून, जाणकारांच्या मार्गदर्शनातून आणि साधकांकडून संकलित केली गेलेली आहे ह्याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.
3 comments:
खूप उपयुक्त माहिती दिली ,धन्यवाद.
उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद, कोणाचे आपल्या घरात येणे बंद करायचं असेल तर काय उपाय करावेत
Khupach chhan mahiti aahe ankush sir
Post a Comment