मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Saturday, September 15, 2012

आई ! घेवू दे ना जन्म


आई ! घेवू दे ना जन्म





'संपला आता सीतामाईचा घोर वनवास

चालती तिची पाऊले प्रगतिपथाकडे

हाती धरुनी विद्येची कास!'

आजच्या स्त्रीने विद्येची महती जाणली आहे. 'चूल आणि मूल' या चक्रातून ती बाहेर पडली आहे. विद्येची कास धरूनच तिने पुरुषप्रधान संस्कृतीच्या बेड्या काही प्रमाणात का होईना, तोडल्या आहेत. तिच्या हृदयात माया, ममता यांचा अथांग सागर भरलेला अहे. चंदनासारखे झिजून ती माहेर आणि सासर अशा दोन्ही खानदानांचे नाव रोशन करीत आहे. अध्यापिका बनून ती नवीन सुसंस्कारित पिढी घडवीत आहे, तर डॉक्टर बनून ती मानव जातीची सेवा करीत आहे. वैमानिक बनून ती आकाशात उंच भरारी घेत आहे! माता यशोधरा, संत मीराबाई, त्यागमूर्ती मदर तेरेसा, मातोश्री रमाई, राष्ट्रमाता जिजाऊ, इंदिरा गांधी यांच्या पराक्रमाच्या यशोगाथेने भारताचा इतिहास सोनेरी अक्षरांनी लिहिला गेलाय!

एवढे असूनही मुलाच्या जन्माला पेढे तर मुलीच्या जन्माला अश्रू. असे का? माता आपल्या बाळाला नऊ महिने गर्भात ठेवते, त्याला जन्म देऊन हे जग दाखवते, त्याच्यावर सुसंस्कार घडवते. पण तोच मुलगा मातेला घरातून हाकलून देतो, तिला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतो. असे अनेक पुत्र आहेत याच भारतात, आमच्या अवतीभोवती, मोठे झाल्यावर माता-पित्यांना घरातून हाकलून देतात किंवा त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात. अशा मुलाला जन्म देण्यापेक्षा आपण निपुत्रिक का नाही राहिलो, असेच त्या मातेला वाटत असणार! गर्भात मुलीची हत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे मुलींची संख्या खूपच घटते आहे. असेच सुरू राहिले तर भावाला बहीण मिळणार नाही. पतीला पत्नी मिळणार नाही. म्हणूनच घेऊ द्या लेकीला जन्म. आईच्या पोटी जन्म घेण्याचा, हे सुंदर जग पाहण्याचा तिलाही अधिकार आहे. या अधिकारापासून तिला वंचित ठेवू नका! 

No comments: