हंबरून वासरले चाटती जावा गाय,
तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय.
आय बाया सांगत होत्या होतो जावा तान्हा,
दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पान्हा,
पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय,
तवा मले पिठामंदी दिसती माझी माय.
तान्या काट्या येचायला माय जाती रानी,
पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवाणी,
काट्याकुट्या लाही तीच मानत नसे पाय,
तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय.
बाप माझा रोज लावी मायेच्या माग टुमण,
बास झाल शिक्शान आता घेउदे हाती काम,
शिकून सान कुठ मोठा मास्तर होणार हाय,
तवा मले मास्तरमंदी दिसती माझी माय.
दारू पिऊन मायेले मारी जावा माझा बाप,
थर थर कापे अन लागे तिले धाप,
कसायाच्या दावणीला बांधली जशी गाय,
तवा मले गायीमंदी दिसती माझी माय.
बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आल पाणी,
सांग म्हणे राजा तुझी कवा दिसलं राणी,
भरल्या डोळ्यां कवा पाही दुधावरची साय,
तवा मले सायीमंदी दिसती माझी माय.
म्हणून म्हणतो आनंदाने भरावी तुझी वटी,
पुन्हा एकदा जनम घ्यावा माये तुझे पोटी,
तुझ्या चरणी ठेऊन माया धरावे तुझे पाय,
तवा मले पायामंदी दिसती माझी माय.
Tuesday, September 18, 2012
तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment