मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Wednesday, November 22, 2017

बहिरजी नाईक:

ओळख "प्रभो शिवाजी राजा" चित्रपटातील ऐतिहासिक व्यक्तिमत्वांची!

बहिरजी नाईक:
Image result for bahirji naik
बहिरजींचे नाव घेतले की डोळ्यांसमोर येते ते छत्रपती शिवरायांचे जगप्रसिद्ध व प्रथीतयश हेरखाते.

बहिरजी हे सोंगे करून उपजीविका करीत असत. साधू, संत, फकीर, गोंधळी, राजे, बादशाह, सरदार यांची हुबेहूब सोंगे ते घेत असत. महाराजांनी एकदा बहिरजींना सोंगे करताना  हेरले आणि त्यांच्या या गुणांचा स्वराज्यासाठी पुरेपूर वापर करता येईल हे जाणून त्यांना स्वतः जवळ ठेवून घेतले.

पुढे काही प्राथमिक मोहिमा त्यांनी चपखलपणे हेरगिरी करून यशस्वी केल्यावर, त्यांना हेरखात्याचा प्रमुख नेमले. बहिरजींनी आपले हेरांचे जाळे स्वराज्यात, तसेच मुघल साम्राज्यात आणि आदिलशाहीत पेरून ठेवले होते.

बहिरजींच्या हेरगिरीच्या जीवावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक योजना आखल्या व यशस्वी केल्या. त्यांच्या सर्वात विश्वासू आणि खासगी सल्लागारात बहिरजी अव्वल होते. 

सुरत लुटीच्या वेळी केलेल्या नोंदीत एक इंग्रज अधिकाऱ्याने शिवरायांसोबतचा एक सरदार लुटीच्या पूर्वी दोन महिने इंग्रज वखारी जवळ भीक मागत असल्याचा उल्लेख आहे. तोच, बहिरजी होय. सुरत मधल्या सर्व वाटा, सर्व सावकार, त्यांची मालमत्ता, तेथील मुघल सैन्य, इत्यादी तपशील त्याने छत्रपती शिवरायांना कळवला होता. त्या माहितीच्या बळावरच महाराजांनी सुरत सारख्या परमुलुखात एवढी धाडसी मोहीम आखली होती. 

जावळीचा विजय, अफझलखानाची मोहीम, साल्हेरचे युद्ध, पन्हाळा, करवीरची चढाई, इत्यादी सर्व मोठ्या मोहिमा बहिरजींच्या हेरगिरीमुळे महाराजांनी यशस्वी केल्या. 

आग्रा कैदेत बहिरजी खुद्द औरंगझेब बादशहाच्या दरबारात सोंग घेऊन गेले आणि तो महाराजांना मारण्याचा कट करीत असल्याची खबर घेऊन आले. त्या माहितीच्या आधारावर छत्रपती शिवराय पुढील दोन-तीन दिवसातच आग्र्यातून निसटले.

छत्रपती शिवरायांनी स्वतः केलेली शेवटची मोहीम म्हणजे १६७९ची जालन्याची लूट. जालना बाजारपेठ फस्त केल्यावर मुघल सरदार रणमस्तखान १०००० ताज्या दमाचे घोडदळ घेऊन महाराजांच्या मागावर आला. छत्रपती शिवरायांजवळ फक्त हुजुरातीचे २५०० घोडस्वार वीर होते. अडीच-तीन कोटींच्या लुटीचे सामान घेऊन वेगाने स्वराज्य गाठणे शक्य नव्हते. तेव्हा, सिधोजी निंबाळकरांनी संताजी घोरपडेला सोबत घेऊन ५०० स्वारांनिशी रणमस्तखानाला झुलवत ठेवले व बहिरजी छत्रपती शिवरायांना बीडच्या जंगलातून एका गुप्त मार्गाने स्वराज्यात सुखरूप घेऊन आले.

धन्य ते बहिरजी नाईक आणि धन्य त्यांना अचूकपणे हेरणारे Prabho Shivaji Raja

No comments: