मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Friday, July 8, 2016

150 शेळ्यांच्या माध्यमातून वर्षाला 20 लाखांची उलाढाल

सांगलीच्या तेजस लेंगरेची यशोगाथा,
150 शेळ्यांच्या माध्यमातून वर्षाला 20 लाखांची उलाढाल
------------------------------------------
सांगली जिल्ह्यातील बामणी (ता. खानापूर) येथील तरुण शेतकरी तेजस लेंगरे यांनी कष्ट व आदर्श व्यवस्थापनातून बंदिस्त शेळीपालन व्यवसाय यशस्वी केला आहे. खानापूरसारख्या दुष्काळी भागात शेतीतून फारसे काही उत्पन्न हाती लागत नाही, असे लक्षात आल्यानंतर न खचता त्यांनी शेळीपालन व्यवसायाला आकार दिला आहे. त्यांच्या शेडमधील शेळ्यांना वर्षभर जागेवरच मार्केट तयार झाले आहे.
👍 संघर्षातून वाटचाल
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुका अवर्षणग्रस्त म्हणून ओळखला जातो. तालुक्‍यात विटा- तासगाव रोडवर विट्यापासून पंधरा किलो मीटरवर बामणी गाव लागते. गावातील काकासाहेब लेंगरे मेंढपाळ होते. परंतु काही कारणास्तव त्यांनी व्यवसाय बंद केला. मोलमजुरीची कामे केली. परिस्थिती अत्यंत हलाखीची बनली. कुटुंबाच्या उपाजीविकेचा मेळ घालताना त्यांची दमछाक होत होती.
परिस्थितीचे चटके सोसत काकासाहेब यांचा मुलगा तेजस याने कर्ज घेऊन पिकअप गाडी विकत घेतली व मालवाहतुकीचा व्यवसाय सुरू केला. घरची साडेतीन ते चार एकर शेती होती. मात्र जिरायती असल्याने त्यातून समाधानकारक काही पिकत नव्हते. मात्र दिवसरात्र कष्ट करून कर्जमुक्ती केली. हे करीत असताना फलटण (जि. सातारा) येथील "नारी' संस्थेतील शेळीपालन व्यवसाय पाहण्यात आला आणि त्याला शेळीपालनातून समृध्दीचा त्याला मार्ग सापडला. त्यानंतर मालवाहतुकीचा व्यवसाय बंद करून शेळीपालनावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले.
👍 असे होते शेळीपालन
तेजस यांच्याकडे सध्या ७० बाय २० फूट व १३० बाय ५० फूट लांबीची दोन शेळीपालन शेड्‌स आहेत. मोठ्या शेडमध्ये मधोमध तीन फुटाची जागा ठेवून १४ फुटांचे स्वतंत्र गाळे तयार करण्यात आले. मागे पाच फूट जागा मोकळी सोडण्यात आली. लोखंडी पट्ट्यांच्या साह्याने प्रत्येक गाळा बंदिस्त करण्यात आला. चारा देण्यासाठी गव्हाणी करण्यात आल्या. लोखंडी पट्ट्यांमधून चारा देण्याची सोय केली आहे. प्रत्येक गाळ्यात सिमेंटच्या खांबाजवळ पाणी देण्यासाठी बकेटची व्यवस्था केली आहे. त्याला नळ कनेक्‍शन दिले आहे.
👍 खाद्य व्यवस्थापन
तेजस यांनी स्थानिक उस्मानाबादी जात व आफ्रिकन बोअर यांचा संकर केला आहे. सद्यःस्थितीत लहान- मोठी मिळून शेळ्यांची संख्या १३० पर्यंत आहे. दोन एकर २० गुंठे क्षेत्र चारा पिकांसाठी राखीव आहे. एक एकरात हत्ती गवत आहे. उर्वरित क्षेत्रात टप्प्याटप्प्याने मका घेतला जातो. लसूणघासही आहे. सुका चारा म्हणून तुरीचा भुसा दिला जातो. सकाळी १० ते ११, दुपारी ४ ते ५, संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत ओला चारा मोठ्या शेळ्यांना प्रतिचार ते पाच किलो व लहान पिलांना दीड ते दोन किलो दिला जातो. मका व गोळी पेंड मिक्‍स करून दिले जाते. प्रथिनांसाठी पावडर पाण्यातून दिली जाते.
👍 शेड व्यवस्थापन
सकाळ-संध्याकाळ शेड स्वच्छ केले जाते. गव्हाणी स्वच्छ करून शिल्लक चारा बाहेर काढला जातो. पिण्याचे पाणी बदलले जाते. शेडला शहाबादी फरशी आहे. १० ते १५ दिवसातून एकदा शेड निर्जंतुक केले जाते. त्यामुळे आजारांचे प्रमाण कमी राहते.
👍 आरोग्याची काळजी
शेळ्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. तरीही आरोग्यासाठी दक्ष राहावे लागते. लहान करडांना चांगले जपावे लागते. सकाळी गोठा साफ करताना शेळीच्या माजाची लक्षणे ओळखे गरजेचे असते. लाळ्या खुरकत, घटसर्प त्याचबरोबर पीपीआर, एफएमडी यांच्या रोगांसाठी वेळच्या वेळी लसीकरण केले जाते. पोट फुगणे, हगवण, जीभेला काटे येणे या बाबींसाठी दक्ष राहावे लागते.
👍 २० गुंठ्यात चारा पिकाची लागवड
तेजसकडं सध्या लहान मोठ्या मिळून १५० शेळ्या आहेत. चाऱ्यासाठी शेजारील २० गुंठ्यावर चारा पिकाची लागवड केली आहे. दिवसातून तीन वेळा या शेळ्यांना त्यांच्या गरजेनुसार चारा दिला जातो. तसंच पाण्यातून प्रथिनं पावडर दिली जाते. त्यामुळं शेळ्यांच्या वजनात वाढ होते. २१ दिवसांनंतर जंताचे औषध दिले जातं. तर दर तीन महिन्यांतून एकदा लसीकरण केले जातं. त्यामुळं या शेळ्या रोगांना बळी पडत नाही.
👍 आफ्रिकन बोअर जातीच्या शेळ्या, नर, मादी आणि पिलांसाठी स्वतंत्र शेड
तेजसनं शेळ्याची अत्यंत चांगल्या पध्दतीनं जोपासना केली आहे. त्यामुळं इथले नर धष्टपुष्ट आहेत. आफ्रिकन बोअर जातीत जुळे पिलं होण्याचं प्रमाण जास्त आहे. तसंच या जातीच्या नरांचे वजन दीड वर्षात १२० किलोपर्यंत होते. त्यामुळं तेजसला अधिक उत्पादन मिळतं.
👍 विक्री व्यवस्थापन
तेजस यांच्या शेडमध्ये धष्टपुष्ट नर पाहण्यास मिळतात. त्यांची चांगली जोपासना केली जाते. बकरी ईद व कुर्बानीसाठी मोठ्या नरांना चांगली मागणी असते. त्यासाठी दीड वर्षात नराचे वजन १०० किलोपर्यंत होते. गेल्या वर्षी दोन बोकड अशा पद्धतीने विकले. त्यांना ७० ते ८० हजारांपर्यंत दर मिळतो. पैदासीच्या कारणासाठीही नर व मादी यांची विक्री केली जाते. तीन ते साडेतीन महिन्यांच्या काळात सुमारे २० किलोपर्यंत वजन झाल्यानंतर त्यांची विक्री दीडहजार रुपये प्रति किलो दराने केली जाते. मागील वर्षी सरासरी २० ते २५ नर व ३५ पर्यंत मादींची विक्री केली. वर्षाला एकूण खर्च सुमारे पाच लाख रुपयांपर्यंत येतो. शक्‍यतो संकरीकरणासाठी दरवर्षी नर खरेदी केला जातो. काही वेळा गाभण शेळीसाठीही मागणी होते. बहुतांशी विक्री जागेवरूनच होते. शेळ्यांना मागणीही चांगली आहे. त्यामुळे मार्केट घरीच तयार झाल्याचे तेजस म्हणाले.
👍 १५०  शेळ्या आणि वर्षाकाठी २० लाखांची उलाढाल
२००६ साली तेजसनं आफ्रिकन बोअर जातीचा एक नर आणि एक मादी खरेदी केली आणि शेळीपालन व्यवसायास सुरुवात केली. सुरुवातीला माद्या तशाच ठेऊन अतिरिक्त नरांची तो विक्री करायचा. त्यामुळं शेळ्याच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत राहीली. दोन शेळ्यांपासून सुरु केलेला तेजसचा हा शेळीपालनचा व्यवसाय आज १५० शेळ्यांवर येऊन पोहचला आहे आणि यातून तेजस तब्बल २० लाखांची उलाढाल करतो.
व्यवसाय जसा वाढला तसं तेजसचं लहान शेड कमी पडू लागलं. त्यामुळं तेजसनं १३० बाय ५० फूट लांबीचं नविन शेड उभारलं. त्यात नर, माद्या आणि लहान पिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली. लोखंडी पट्ट्यां वापरून गाळे बंदिस्त केले. खाद्य देण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली. जमिनीवर शहाबादी फरशी वापरली. त्यामुळं गोचिड आणि पिसवांचा त्रास कमी झाला.
👍 ईदीचे बोकड लाखाच्या घरात
बकरी ईदला यातील  नरांचे तेजसला ७० हजार ते १ लाखांपर्यंत पैसे मिळतात. तसंच इतर शेळ्यांची तेजस दर तीन ते साडेतीन महिन्यांनी प्रजननासाठी विक्री करतो. त्यातून त्याला दीड हजार रुपये किलोच्या दरानं पैसे मिळतात आणि यासाठी त्याला बाजारपेठ शोधावी लागत नाही. तर व्यापारी जागेवर येऊनच या शेळ्या घेउन जातात.
मागील वर्षी तेजसनं २५ नर आणि ३५ माद्यांची विक्री केली. त्यातून त्याला २० लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं. यातून ५ लाखांचा उत्पादन खर्च वजा जाता तेजसला १५ लाखांचा निव्वळ नफा झाला. यासोबतच २२ ट्रॉली लेंडीखताच्या विक्रीतून अतिरिक्त ५० हजारांचं उत्पन्न मिळालं.
👍 साधली आर्थिक प्रगती
तेजस यांनी शेळीपालन व्यवसायापासून आर्थिक प्रगती करताना तीन एकर जमिनीची खरेदी केली. त्याच बरोबर जमीन सपाटीकरण, शेतीत संपूर्ण क्षेत्रास ठिबक अशी कामे करणे शक्‍य झाले. भविष्यात शेळ्यांची संख्या एक हजारपर्यंत वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. वडील काकासाहेब यांची त्यांना मदत होते. तर भाऊ योगेश यांचे मोठे सहकार्य मिळते. शेतीपेक्षा शेळीपालन हाच आमच्यासाठी आर्थिक आधार ठरल्याचे तेजस म्हणाले.
👍 तेजस यांच्या शेळीपालनाची वैशिष्ट्ये
- शेळ्यांना सोन्यासारखी मागणी
- गाई-म्हशींमध्ये गाभण अवस्था, वेताचा काळ या गोष्टी महत्वाच्या असतात. शेळी ही वाढीच्या कोणत्याही अवस्थेत विकता येते.
- बंदिस्त शेळीपालनातून वर्षाला १८ ते २० ट्रॉली लेंडीखत मिळते. त्यातील ५० टक्के खत घरच्या शेतीसाठी वापरले जाते. उर्वरित खत प्रतिट्रॉली चार हजार रुपयांप्रमाणे विकले जाते.
- चारा पिकांसाठी सुमारे सव्वा एकर क्षेत्र राखीव ठेवले आहे.
- दर महिन्याला शेळ्यांचे वजन घेतले जाते. दिवसाला साधारण २०० ते २५० ग्रॅम तर महिन्याला ते ८-९ किलोपर्यंत वाढते.
संपर्कः तेजस लेंगरे - 9881213000
-----------------------------------------------------------------------------------
चला घडवूया साक्षर, संपन्न आणि समृद्ध महाराष्ट्र "नवी अर्थक्रांती" सोबत
लाईक करा :

No comments: