वैद्य राजश्री कुलकर्णी
पावसाळ्याच्या चार महिन्यांतील कुंद हवा आणि गारवा, तेलकट तुपकट आहार, पावसाचं आलेलं नवीन पाणी या सर्वांचा परिणाम म्हणजे
ऑक्टोबरमध्ये डोकं वर काढणारे नानाविध आजार. छातीत जळजळ आणि मळमळ डोकं दुखणं आणि पोट दुखणं असं काही झालं की, ऑक्टोबर हिटचे आजार म्हणून त्याकडे बघितलं जातं. ऑक्टोबर म्हणजे ¬तूच्या संक्रमणाचा महिना. या संक्रमण काळात होणारच बदल आणि बदलाचा त्रासही. पण आपण या काळत काय आहारविहार ठेवतो त्यावर या हिटच्या तडाख्यात आपलं तरून जाणं अवलंबून असतं.
पित्त हद्दपार होतं?
ज्यांना नेहमीच पित्ताचा त्रास होतो किंवा डोकं दुखण्याची, उलट्या होण्याची ज्यांना सतत तक्रार असते त्यांनी केवळ आहारविहारात बदल करून खास असा फायदा होत नाही. कारण वाढलेलं पित्त त्यामुळे फक्त दबतं. ते शरीराबाहेर काढून टाकणं हाच यावरचा उपाय आहे. ते काढण्याची एक शास्त्रोक्त पद्धत उपलब्ध आहे.
हे बिघडलेलं व वाढलेलं पित्त शरीराच्या बाहेर काढून टाकायचं असेल तर त्यासाठी शरीरशुद्धी करणं गरजेचं आहे. पंचकर्म उपचार हे शरीराची शुद्धी करण्यासाठीच अपेक्षित आहेत. पित्तदोषाच्या शुद्धीसाठी ‘विरेचन’ म्हणून कर्म केले जाते. बरेचदा वाढलेल्या व विदग्ध झालेल्या पित्तानं रक्तही बिघडते. त्यामुळे अनेक प्रकारचे त्वचाविकारही शरदऋतूत त्रास देऊ लागतात. म्हणून रक्त विशिष्ट प्रमाणात शरीराच्या बाहेर काढून टाकलं जातं. या क्रियेला ‘रक्तमोक्षण’ म्हणतात.
विरेचन
शरीरातून वाढलेलं व बिघडलेलं पित्त गुदद्वारामार्गे जुलाबाच्या सहाय्यानं काढून टाकणं म्हणजे विरेचन कर्म होय. पण हे जुलाब शास्त्रशुद्ध पद्धतीनं केले जातात. केवळ नुसते एखादे जुलाबाचे औषध घेऊन नव्हे! हे दोष शरीराबाहेर काढण्यापूर्वी शरीराची पूर्वतयारी करावी लागते म्हणजे दोष चांगल्या पद्धतीने, योग्य प्रमाणात व काही त्रास न होता बाहेर पडतात. यासाठी रुग्णाला आधी त्याच्या कोठय़ानुसार तीन ते पाच दिवस औषधी तूप प्यायला दिलं जातं व रोज संध्याकाळी वाफ दिली जाते. त्यामुळे अपेक्षित असणार्या बदलांची लक्षणं दिसली की, पुढे तीन दिवस तूप न घेता फक्त वाफ दिली जाते. त्यानुसार सातव्या किंवा नवव्या दिवशी विरेचन हे प्रत्यक्ष कर्म केलं जातं.
जुलाब किती व्हावेत असे अपेक्षित असते त्यानुसार व रुग्णाच्या कोठय़ानुसार औषध ठरवलं जातं. मग साध्या एरंडेल तेलापासून ते विविध प्रकारच्या तीव्र रेचकापर्यंत औषधं वापरता येतात. वैद्याच्या देखरेखीखालीच हे औषध रुग्णाला देऊन त्याचं निरीक्षण केलं जातं. ठरावीक संख्येएवढे जुलाब होऊन नंतर ते आपोआप थांबतात. नंतर दिवसभर रुग्णाला विश्रांती घेण्यासाठी सांगितलं जातं. त्यानंतर पाच दिवस रुग्णाला विशिष्ट प्रकारचा हलका असा आहार घ्यायला सांगितलं जातं. अशा पद्धतीनं ऑक्टोबर हिटमुळे तीव होणार्या पित्तदोषाची पूर्ण शुद्धी केली जाते.
दूध, मध आणि तूप
कोणत्याही ऋतूमध्ये बदलत्या हवामानाचा त्रास होऊ नये किंवा शरीराला त्याची लवकर सवय व्हावी म्हणून आहारविहारात बदल करणं हा सर्वात उपयुक्त उपाय होय. याच दृष्टीनं आहारात दुधाचा समावेश करायला हवा. वातदोषासाठी तेल, कफदोषासाठी मध आणि पित्तदोषासाठी दूध हे अतिशय उत्तम, आहारातील औषध ठरतं. याच हेतूनं कोजागरी पौर्णिमेला दूध पिण्याची पद्धत सांगितलेली आहे. अश्विन महिन्यात आकाश अतिशय स्वच्छ असतं व टिपूर चांदणंही पडतं. चंद्रप्रकाश हा अतिशय शीतल किंवा थंड गुणाचा आहे. त्यामुळे रात्री दूध प्यावं तेही केवळ साधं नव्हे तर गच्चीवर किंवा अंगणात आधी ते दूध चंद्रकिरणांमध्ये बराच वेळ ठेवावं, त्यात खडीसाखर घालावी आणि मग ते प्यावं. म्हणजे त्यातले गोड, थंड गुण शरीरातील पित्त लगेच कमी करतील. एकूणच अशा प्रकारचे गार दूध पूर्ण शरदऋतूत जरी प्यायलं तरी ते शरीराला हितकारकच आहे. नंतर हिवाळ्यात दूध पिणं सुरू ठेवायचं असलं किंवा शरीरपुष्टी हा उद्देश असला तर मात्र थंड दूध आणि ते रात्री न पिता दूध सकाळच्या वेळी आणि गरम प्यावं. आहारामध्ये दुधाचा समावेश करावा त्याचबरोबर चांगलं तूपही खाल्लं पाहिजे. विशेष करून गायीचं तूप अधिक गुणकारी होय.
पित्त आणि पथ्यं
आहारात पचायला हलके असणारे व त्याचबरोबर चवीला गोड, तुरट, कडू चवीचे लागणारे पदार्थ घ्यावेत. हे सर्व रस पित्त कमी करणारे आहेत. तांदूळ, गहू, मूग ही धान्यं, दुधीभोपळा, पडवळ यांसारख्या भाज्या खाव्यात. जास्त तिखट, मसालेदार, आंबट पदार्थ वापरू नयेत. खूप पोट भरेल एवढे जेवू नये. जेवल्यानंतर झोपू नये. जास्त मीठ क्षार असणारे असे लोणची, पापड इ. पदार्थ टाळावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दही अजिबात खाऊ नये. दही शरीरावर उष्ण परिणाम करणारं व त्यामुळे पित्ताचा त्रास वाढविणारं आहे म्हणून ते पूर्ण बंद करावं. तळलेले पदार्थ, मसालेदार, मांसाहारी पदार्थ खाऊ नयेत.
थंड गुणाच्या पाककृती
या ऑक्टोबर हिटमध्ये शरीर थंड ठेवणार्या काही खास पाककृती आहेत.
खीर
साहित्य : सुवासिक तांदूळ, दूध, खडीसाखर, वेलदोडे, तूप.
गायीच्या तुपावर तांदूळ चांगले गुलाबी होईपर्यंत परतावे व नंतर मिक्सरमध्ये बारीक करावे. दूध चांगलं गरम करून त्यात हे तांदूळ मिसळावे व शिजेपर्यंत खीर उकळून घ्यावी. खीर गुणकारी व्हावी या दृष्टीनं त्यात खडीसाखर बारीक करून घालावी. स्वादासाठी वेलदोडा पूड घालावी.
शीतल दूध
साहित्य : दूध, सब्जाचं बी/ तुकुमराई, खडीसाखर, बेदाणे, वेलची पूड.
दूध चांगलं उकळून नंतर गार करावं. रात्री सब्जाचे बी किंवा तुकुमराई पाण्यात भिजत घालावी म्हणजे चांगली फुगेल. खडीसाखर बारीक करून ठेवावी. दुपारी जास्त उन्हाच्या वेळी गार दुधातच खडीसाखर, बेदाणे, वेलची पूड त्याचप्रमाणे भिजवलेलं सब्जाचं बी घालावं. यामुळे शरीरातील उष्णता आणि वाढलेलं पित्त नियंत्रणात येतं.
खजूर-खवा-गुलकंदाचे रोल
खजूर बिया काढून अगदी मऊ करून घ्यावा. खवा मळून घ्यावा. नंतर खजूर व खवा एकत्र करून हे मिश्रण चांगलं एकजीव करावं. या मिश्रणाचा गोळा करून पोळपाटावर लाटावा व त्या पोळीवर गुलकंद पसरून त्याचा रोल करावा. त्याचे एक-एक इंचाचे तुकडे करून सुक्या खोबर्यात हे रोल घोळवून घ्यावं.
व्हेज क्लिअर सूप
साहित्य : टोमॅटो, कोथिंबीर, कांदा, धने, जिरे पूड, मीठ, साखर आणि गाईचं तूप.
टोमॅटो उकडून घ्यावे. सालं काढून तुकडे करावे. कांद्याचेही तुकडे करावे. भरपूर कोथंबीर धुवून चिरून घ्यावी. सगळ्या भाज्या मिक्सरवर एकत्र फिरवून एकजीव कराव्या. गाळणीवर गाळून वरचा चोथा बाजूला ठेवावा. खाली भाज्यांचे स्वच्छ मिश्रण मिळेल.
कढईत गाईचं तूप घ्यावं. त्यात जिरे, हिंग यांची फोडणी करावी. त्यात वरील भाज्यांचे पातळ मिश्रण टाकून ते चांगलं उकळून घ्यावं. यात चवीपुरतं मीठ आणि साखर टाकावी.
एरवी आपण सूपमध्ये मिरेपूड, लवंग, दालचिनी इ. मसाले वापरतो. पण हे पदार्थ गुणानं उष्ण असल्यानं ऑक्टोबर हिटमध्ये वापरू नये. धणे-जिरे मात्र उष्णता कमी करतात त्यामुळे ते सुपातून वापरावे.
No comments:
Post a Comment