मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Thursday, January 10, 2013

सावित्रीबाई फुले ...


सावित्रीबाई फुले जयंती ...
भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका आणि महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या आद्य प्रणेत्या ...

सौजन्य- लोकशाही वार्ता 
लेखक प्रकाश दुलेवाले

स्त्रीशिक्षणाची पहिली मशाल

प्रासंगिक

माणसाच्या उत्थानासाठी, त्याला त्याच्या ध्येयापर्यंत नेणारे मार्ग सुस्पष्ट असायला पाहिजे. मार्गात येणार्‍या समस्यांचा विचार करण्याची कुवत त्याच्यात असायला पाहिजे. ही कुवत निर्माण होण्यासाठी त्याने शिक्षण घेतले पाहिजे. पण, शिक्षणाची संधीच नसल्याने तो शिक्षण घेणार कसा? ही गोष्ट जोतिबा फुले यांनी ओळखली, म्हणून तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण पोहचावं यासाठी ते सतत कष्टले. त्यांच्या या कार्यात क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी स्वत:ला झोकून दिले. 
क्रांतिज्योती सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाई या खंडोजी नेवशे (पाटील) यांच्या ज्येष्ठ कन्या. त्यांचे १८४0 मध्ये वयाच्या अगदी ९ व्या वर्षी जोतिबा फुले यांच्यासोबत लग्न झाले. महात्मा फुल्यांची जन्मदात्री आई लवकर वारल्याने त्यांचा सांभाळ नात्यातील सगुणाबाई या स्त्रीने केला होता. शिस्तप्रिय, प्रेमळ व शिक्षणाची आवड, अशी सगुणाबाईंची स्वभाववैशिष्ट्ये होती. सगुणाबाईस सावित्रीबाई फारच आवडू लागली. ती जोतिबास एकदा म्हणाली, जोती तू जसा शिकतोस, त्याप्रमाणे सावित्रीलाही शिकव. पुढे संसारात तिचा तुला फार उपयोग होईल. जोतीचे बालपण तिच्या छायेखाली गेले होते. जोतिबा सगुणाबाईला आऊ म्हणत असत. ते म्हणाले, आऊ, आपली आज्ञा शिरसावंद्य. दोघींनाही मी लिहायला व वाचायला शिकवीन. अशाप्रकारे लग्नाच्या एका वर्षानंतर लगेच १८४१ मध्ये सावित्रीबाईंच्या व आऊच्या शिक्षणास प्रारंभ झाला. हा प्रारंभ म्हणजे जोतिबांच्या समाजक्रांतीचे पहिले पाऊल होय. पुढे १८४७ मध्ये सावित्रीबाईंनी नॉर्मल स्कूलमधून शिक्षक प्रशिक्षण पूर्ण केले. 
स्त्री आणि शूद्रादी, अतिशूद्रादी यांची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्वत: प्रचलित रुढ समाजव्यवस्थाच नाकारली. ते सामाजिक व धार्मिक बंधनाविरुद्ध उभे राहिले. त्यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथे भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा स्थापून स्त्रीमुक्तीचा झेंडा भिड्यांच्या वाड्यावर फडकाविला. ती शाळा सार्‍या हिंदुस्थानात एतद्देशीयांनी काढलेली मुलींची पहिली शाळा होय. या शाळेत सावित्रीबाई शिक्षिका झाल्या. त्यानंतर १५ मे १८४८ रोजी अस्पृश्य मुलामुलींसाठी शाळा उघडली. अशा १८४८ ते १८५२ या काळात लागोपाठ १८ शाळा काढल्या. स्त्री वा पुरुष कोणीही असो शिकल्याशिवाय माणूस या सं™ोस पात्र होणार नाही, असा त्यांचा मंत्र होता. म्हणून आयुष्यभर सावित्रीबाईंनी शिक्षणाचा प्रचार प्रसार केला. त्या आपल्या काव्यात म्हणतात, 
शूद्रांना सांगण्याजोगा। आहे शिक्षण मार्ग। 
शिक्षणाने मनुष्याचे। पशुत्व हाटते पहा। 
तसेच १ मे १८४९ रोजी पुणे येथील उस्मान शेख यांच्या वाड्यात प्रौढांच्या शाळेची स्थापना केली. येथे सावित्रीबाई अध्यायन करायच्या. सावित्रीबाई व जोतीराव फुले यांचा मुलामुलींना र्शमप्रधान शिक्षण देण्यावर भर होता. मुलींना विचारशील व स्वावलंबी बनविणे हा त्यांचा हेतू होता. यासाठी म. फुले यांनी पुण्यात व इतर ठिकाणी शाळा काढून शिक्षणाची मोहीमच सुरू केली. बहुजन समाजातील माणसांना माणूस म्हणून जगता यावे म्हणून शिक्षणाचा प्रसार केला. या मोहिमेच्या प्रमुख शिलेदार सावित्रीबाई होत्या. 
'जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती! 
देह कष्टविती। परोपकारी।'
या उक्तीप्रमाणे म. जोतिबा आणि सावित्रीबाई या उभयतांनी लोककल्याणार्थ आपले देह सार्थकी लावले. त्यासाठी त्यांनी तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास केला. वरिष्ठ वर्गातील काही थोड्या जाती-जमातींची जीवन परिस्थिती चांगली होती. तथापि बहुसंख्य असलेले महारमांग, कुणबी इत्यादी शूद्रादी अतिशूद्र लोकांची परिस्थिती अत्यंत वाईट होती. स्त्रियांची अवस्था भोळ्या मेंढय़ापेक्षाही वाईट होती. 
त्या काळात सर्वांसाठी शिक्षणाची सोय नव्हती म्हणून जोतिबांनी बहुजन समाजातील मुलांसाठी व सर्वच समाजातील मुलींसाठी शाळा काढण्याचे ठरविले. जोतिबांची शिक्षणाविषयीची तळमळ पटल्याने तात्यासाहेब भिडे या शिक्षणप्रेमी व्यक्तीने आपल्या वाड्यातील जागा मुलींच्या शिक्षणासाठी जागेचे काहीही भाडे न घेता दिली. शिवाय प्रोत्साहन म्हणून शाळेसाठी ५ रुपये बक्षीसही दिले. या शाळेत शिक्षिका म्हणून सावित्रीबाई काम करू लागल्या. अशाप्रकारे भारतातील पहिली शिक्षिका होण्याचा मान त्यांना मिळाला. 
पुरुष वर्गातील कोणीही असो, योगी, संत, बाप असो की भाऊ असो त्यांनी स्त्री जातीकडे उदार दृष्टीने पाहिल्याचे आढळून येत नाही. मानव प्राण्यातील पुरुष वर्गाने इतर प्राणी जसे दावणीने बांधले आहेत, तसा प्रयत्न स्त्रियांबाबत पुरुष वर्ग सतत करत आला आहे. सार्‍यांनी स्त्री जातीवर अत्याचार केले. स्त्रिया गुलामगिरीच्या पुरुषी खोड्यात अडकलेल्या होत्या. देशातील सर्व स्त्रिया अमानुष अत्याचारास तोंड देत कशाबशा जगत होत्या. त्यांची या त्रासातून सोडवणूक करण्याचा पहिला प्रयत्न म. जोतिबा व त्यांची पत्नी सावित्रीबाई या उभयतांनी केला. त्यांचे हे कार्य असामान्य आहे. 
स्त्रीजन व शूद्रादी अतिशूद्रजन यांच्या गुलामगिरीची पराकोटी झाली होती. अशा बिकट परिस्थितीत दीनदुबळे स्त्रीजन अंधार्‍या परिस्थितीतून चाचपडत मार्ग शोधत होते. पण त्यांना मार्गच सापडत नव्हता. धर्मविचार आणि सामाजिक रुढी डोक्यावर घेऊन समाज नाचत होता. आपल्या परिस्थितीचे दु:ख न करता सुखच मानीत होता. या सर्व परिस्थितीचा अभ्यास जोतिबांनी केला. या परिस्थितीचे मूळ समाजाच्या पुरुषसत्ताक रचनेत आहे. क्रांतीची मशाल जोतिबांनी पेटवली आणि ती सावित्रीबाईंच्या हातात दिली. २४ सप्टेंबर १८७३ रोजी जोतिबांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. १८४८ ते १८७३ च्या २५ वर्षांच्या कालखंडात जोतिबा व सावित्रीबाई यांनी विविध संस्था स्थापून त्या समाजक्रांतीस किती उपयुक्त आहे, हे सांगितले. त्या संस्था अशा, १. मुलींची शाळा २. अस्पृश्य मुलांची शाळा ३. बालसंगोपन केंद्र ४. बालहत्या प्रतिबंध केंद्र ५. हळदी-कुंकू समारंभ मंडळ ६. विधवा विवाह महिला संघ ७. सत्यशोधक समाज, ८. शेतकरी संघ ९. दुष्कळ निवारण मंडळी १0. प्लेग निवारण महिला कमिटी या सर्व संस्थांनी त्या काळात लक्षणीय कार्य केले आहे. 
१८९६ साली महाराष्ट्रात फार मोठा दुष्काळ पडला होता. त्यापूर्वी १८८७ मध्येही दुष्काळ पडला होता. दुष्काळात सत्यशोधक समाज कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन ठिकठिकाणी अनेक अन्नछत्रे उघडून लोकांचे प्राण वाचविले. या दुष्काळाचे सविस्तर वर्णन फॅमिन कमिशनच्या रिपोर्टात पाहायला मिळते. हाती घेतलेल्या कार्यावर निष्ठा व ते यशस्वी करण्यासाठी जिवापाड कष्ट करणे, तशात १८९७ साली जानेवारीत पुणे येथे प्लेगची साथ सुरू झाली. या साथीत पछाडलेल्या रोग्यांची सेवा करता करता सावित्रीबाई स्वत:च प्लेगने पछाडल्या गेल्या. यातच त्यांचा १0 मार्च १८९७ साली मृत्यू झाला. जनसेवेत असताना धारातीर्थी पडणारी धन्य ती क्रांतिज्योती! *स्त्रीशिक्षणाचा पाया रचणार्‍या पहिल्या भारतीय सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारीला असली तरी त्यांच्या क्रांतिकारी प्रयोगाची मुहूर्तमेढ १६५ वर्षांपूर्वी रोवली गेली ती १ जानेवारीला. यावेळी त्यांचे वय होते अवघे सतरा वर्षे!५

No comments: