व्यसने
व्यसने ही पुरातन आहेत. काही लोक त्याला कडाडून विरोध करतात. समाजकंटक आणि सरकारला व्यसनांपासून आर्थिक उत्पन्न मिळते पण अगणित कुटुंबांची दैना होते. कित्येक देशांची अर्थव्यवस्था मादक पदार्थांच्या व्यापारावर अवलंबून आहे. जगातल्या दहशतवादी चळवळीही यावरच पोसतात. व्यसनांना रोखण्यासाठी केलेली अंमलबजावणी यंत्रणा मधल्यामध्ये गबर होऊन जाते असा अनेक देशांमधला अनुभव आहे. व्यसन हे केवळ वैयक्तिक पातळीवरचे संकट नाही. देशच्या देश या समस्येने त्रस्त आहेत. गावातही आपण दारूगुत्त्यांचे साम्राज्य व राजकारणातील त्यांचे वर्चस्व ओळखून असतो. कारणे पूर्वी व्यसने नव्हती असे नाही, पण त्यावर काही लगाम होते. पूर्वी सर्व समाज श्रमावर जगणारा होता, काम नसलेल्या व्यक्तींची संख्या कमी होती. आता आर्थिक उत्पन्नात वाढ झाल्याने दरडोई-सुबत्तेचे प्रमाण वाढले आहे. दुसरे म्हणजे पूर्वी दारू कुटुंबाने एकत्र बसून घ्यायचा एक विरंगुळा होता. त्याने फारसे झिंगणे किंवा बेलगाम होणे शक्य नव्हते. व्यसने ही अधिक वैयक्तिक होत गेली तशी ती अनियंत्रित होत गेली. अनेक कुटुंबांत एखादा मनुष्य व्यसनी झाल्याचे उशिरा कळते; तोपर्यंत इतरांना कल्पनाही येत नाही. एखादी व्यक्ती व्यसनांकडे का ओढली जाते? याला अनेक कारणे आहेत. संपन्नता,हलाखी, स्वभाव, दुःखे, निराशा, रिकामपणा, आपली जीवनदृष्टी, संगत वगैरे अनेक कारणे यात येतात. व्यसनांच्या वस्तू जवळपास आणि स्वस्त उपलब्ध असणे हा शेवटी महत्त्वाचा भाग आहे. व्यसनाधीनता हे मानसिक आजारांचेच अंग आहे. केवळ गंमत किंवा आग्रह म्हणून सुरुवात होते. नंतर ती व्यक्ती त्या व्यसनावर पूर्णपणे अवलंबून राहते. संबंधित पदार्थ मिळाला नाही तर त्या व्यक्तीला मानसिक तसेच शारीरिक त्रास होतो. दीर्घ व्यसनाधीनतेने मानसिक बदलही होतात. व्यसने केवळ गरिबांमध्ये आहेत असे नाही. नवश्रीमंत वर्गातही दारू वगैरे व्यसने शिष्टसंमत आहेत. अशिक्षितांइतकीच सुशिक्षितांमध्येही व्यसने भरपूर प्रमाणात आहेत. व्यसनात थोडी आनुवंशिकता असल्याचे दिसते. म्हणजे काही माणसे जन्मतःच थोडी व्यसनाकडे झुकणारी असतात. पण सामाजिक संस्कारांनी यावर मात करता येते. |
No comments:
Post a Comment