मला कारण शोधायचंय..
दुर्दैवी अपयशाचं..
आणि स्वप्नांच्या नाशाचं..
मनाच्या कठोर वेदनेचं..
बधीर झालेल्या संवेदनेचं..
मला कारण शोधायचंय..
सततच्या उद्वेगाचं..
भावनांच्या आवेगाचं..
गोठलेल्या जीवनाचं..
मेलेल्या कल्पनांचं...
मला कारण शोधायचंय..
खोटं खोटं हसण्याचं..
हळूच डोळे पुसण्याचं..
व्यर्थ प्रयास करण्याचं..
आणि भाबडी आस धरण्याचं..
मला कारण शोधायचंय..
त्याच वाटेवर पुन्हा येण्याचं..
पुन्हा तोच धोका घेण्याचं..
अपयशाच्या पायरीवर बसून..
यशाचं स्वप्न बघण्याचं..
मला कारण शोधायचंय..
उगीच दाखवलेल्या हर्षाचं..
स्वत:शीच घडणाऱ्या संघर्षाचं..
मळभ आलेल्या आकाशाचं..
अंधुक होत जाणाऱ्या प्रकाशाचं..
मला कारण शोधायचंय..
अनपेक्षित त्या घडामोडींचं..
असंख्य अशा तडजोडींचं..
सुखामागच्या धावपळीचं..
भावनांच्या वावटळींचं..
मला कारण शोधायचंय..
आजवरच्या या जगण्याचं..
वाटेवर उभ्या मरणाचं..
माझ्या त्या नैराश्याचं..
आणि तुझ्या गूढ हास्याचं..
मला कारण शोधायचंय..
- शंकर दुधाणे
No comments:
Post a Comment