मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Sunday, November 25, 2007

निरोगी जीवन

(source :: ma.ta.)

निरोगी जीवन जगणं हा माणसाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. निरोगी जीवनासाठी आहार आणि विहार याचा प्रामुख्याने विचार केला जातो. विहार म्हणजे शरीर सुदृढतेसाठी केलेला कुठलाही व्यायाम. आजकाल चालणं , धावणं , पोहायला जाणं , जीममध्ये जाणं या व्यतिरिक्त अनेक प्रकारचे व्यायाम लोक करतात. परंतु ऋषीमुनींपासून या भारताला ज्या व्यायाम प्रकाराची ओळख आहे तो म्हणजे योग.

काळ झपाट्याने बदलत आहे. मानवी जीवन गुंतागुंतीचं होत आहे. अनेक प्रसंग क्षणोक्षणी अस्वस्थ करणारे असतात. अशा अस्थिरतेने भरलेल्या या आधुनिक काळात मनावर अंकुश ठेवून शरीर व मनस्वास्थ्य राखण्यासाठी योगाची आवश्यकता आहे.

no yoga no peace know yoga know peace

हे बोल किती अर्थपूर्ण आहेत. आजच्या काळात काही अपवाद सोडले तर सर्वच आधुनिक सुविधांचा आपण लाभ घेत असतो. पूवीर्च्या जीवनापेक्षा कष्ट किंवा श्रम आज कित्येक पटीने कमी झाले आहेत. पण वाढलेत ते मानसिक ताण आणि पोटाचा घेर. या जगात ' सर्व जगी सुखी असा कोण आहे ' हा प्रश्न विचारला तर कोणाकडूनही ' मी ' असं उत्तर येणं कठीण आहे.

' लहानपण देगा देवा ' अशी काही वर्षांपूर्वी देवाला मागणी करणं फार सोपं वाटत होतं. पण अलीकडे बालवाडीच्या मुलांपासून चष्मा लावलेली , वजन वाढलेली , सतत काळजीत असलेली मुलं बघायला मिळतात.

असं का ? याला उत्तर आजची सामाजिक , आथिर्क , कौटुंबिक परिस्थिती. सतत डोळ्यासमोर टीव्ही , कर्कश संगीत , मैदानी खेळांचा अभाव , आईवडील नोकरीच्या निमित्ताने दिवसभर घराबाहेर , एकत्रित कुटुंबाचा ऱ्हास , एखाद् दुसरं मूल , त्यांच्याकडूनच सर्व अपेक्षा करणं , कामाची असमान विभागणी , सतत नोकरीच्या निमित्ताने प्रवास , दगदग , हेवेदावे , छोट्या छोट्या आजारांसाठी औषध घेणं , जेवणा-खाण्याच्या अनियमित वेळा , असंतुलित आहार , अपुरी झोप , प्रदूषण इत्यादी.

या सगळ्या समस्यांना दूर ठेवायचा एकच मार्ग योग , प्राणायाम , ध्यान. योग हा फक्त व्यायाम नसून संपूर्ण शरीराला आतील बाहेरील अवयवांना हळूवारपणे मसाज देऊन त्यांना योग्य आकार देणारा प्रकार आहे. बांधा बांधेसूद बनवतो. व्यक्तिमत्त्वात भर घालतो. आत्मविश्वास वाढवतो. अनेक प्रकारची योगासनं मानवी शरीराला वेगवेगळ्या प्रकारे उपयुक्त आहेत. आपल्या शरीराला आवश्यक वाढवतो. अनेक प्रकारची योगासनं मानवी शरीराला वेगवेगळ्या प्रकारे उपयुक्त आहेत. आपल्या शरीराला आवश्यक ती आपण निवडू शकतो. त्याप्रमाणे त्याचा फायदा करून घेऊ शकतो. कितीही दिवस योगाभ्यास केला तरी वजन तितकंच राहतं. हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण योगाभ्यासाच्या सवयीनंतर हळूहळू आहारावर , भुकेवर थोड्याफार प्रमाणात नियंत्रण ठेवून वजन हे योग्य प्रमाणात कमी किंवा जास्त होऊ शकतं.

म्हणतात ना ' सास है तो आस है '. प्राणायामद्वारे आपण आपल्या श्वासाला नियमित करू शकतो. श्वासाद्वारे आपण आपलं आयुष्य सुखकर बनवू शकतो. कित्येक आजारामध्ये आजकाल डॉक्टरसुद्धा प्राणायामचा सल्ला देतात. जन्माच्या क्षणापासून ते आतापर्यंत जो अखंडपणे आपल्या शरीराशी निगडित असतो तो श्वासासाठी , निरोगी शरीरासाठी अनेक प्रकारचे प्राणायाम करू शकतो.

योग आणि प्राणायाम याविषयी आपल्याला थोड्या फार प्रमाणात माहिती असते. पण आजकाल ' ध्यान ' हा नवीनच शब्द बराच कानावर पडू लागला आहे. याचं कारण वाढलेला ' मानसिक ताण '. तो आपण ' ध्यान ' साधनेद्वारे कमी करू शकतो. प्रत्येक माणूस आज थकलेला , दमलेला , ताणग्रस्त आढळतो. मग तो देशाचा पंतप्रधान असो , कुणी कारकून असो वा शाळकरी मूल. ' ध्यान ' करता येणं तसं जरा कठीणच आहे. पण सवयीने ते कुणालाही आत्मसात करता येतं. ' ध्यान करता येणं ' म्हणजे आयुष्यात सर्वस्व प्राप्त झालं म्हणायला हरकत नाही.

पण आजच्या धकाधकीच्या जीवनात हे सर्व करायला वेळ कुठे आहे ? ' मरायलाही वेळ नाही ' असं म्हणणारा माणूस ' मरूच नये कधीही ' म्हणून सतत प्रयत्नात असतो. अप्रत्यक्षपणे मृत्यू जितका भयानक त्यापेक्षा मृत्यूच्या आधी जे जीवन आपण तडफडत जगतो ते जास्त भयानक ' प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर '. म्हणून कुठल्याही छोट्यामोठ्या आजारांना दूर ठेवणारं रामबाण औषध म्हणून प्रत्येकाला आपल्या दिवसातील 1440 मिनिटांतील 30 मिनिटं ही स्वत:साठी राखून ठेवलीच पाहिजेत. ' अ बिझी मॅन ऑलवेज फाइण्ड्स टाइम अॅण्ड लेझी मॅन नेव्हर ' असं म्हटलं जातं. वेळ हा मिळत नसतो तो काढावा लागतो. ' आरोग्यदायी जगावं आणि सुखाने मरावं ' असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

' पी हळद आणि हो गोरी ' या उक्तीप्रमाणे आज योगा केंदात जाऊ लागल्यावर उद्या सुडौल आणि निरोगी शरीर प्राप्त होणं शक्य नाही. पण योगास जीवनाचा अविभाज्य भाग बनवा आणि जीवनाला एक सुंदर वळण देऊन बघा. ज्या वळणावर फक्त मिळेल सुख आणि शांती. आजकाल बरीच योगाकेंदं दिसतात. पण त्याचबरोबर अजून एक गोष्टही नजरेत भरते ती म्हणजे तिथली ' अनुपस्थिती '. हॉटेल आणि चित्रपटगृहांसारखी तुडुंब गदीर् तिथे कधीस नसते. कारणं जरी वेगवेगळी असली तरी एक महत्त्वाचं कारण म्हणजे आरोग्याविषयी निष्काळजी. ' हेल्दी माइण्ड इन हेल्दी बॉडी ' म्हणजे निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते. मन निरोगी असेल तर आयुष्यातील 99 टक्के प्रश्न उरतच नाहीत , नाही का ?


- प्रतिभा सराफ

No comments: