मी मराठा

पेटवुन टाकिल आख्खा महाराष्ट्र मराठीच्या जयघोषानं... मी युवा महाराष्ट्राचा... माझी भाषा.....माझा अभिमान...

Sunday, November 25, 2007

अंधाराचे साम्राज्य

(Source :: म.टा.)
फार फार प्राचीन काळची ही गोष्ट. एकविसाव्या शतकात महाराष्ट्र नावाचे एक प्रगत राज्य या भारतवर्षात होते. भारतवर्षात त्या काळी जी काही राज्ये होती, त्यातले महाराष्ट्र राज्य खूपच पुढारलेले व श्रीमंत होते. या राज्यात मोठी कारखानदारी होती, प्रगत शेती होती, समाज पुढारलेला होता, राजकारणी सुसंस्कृत होते, संगीत, नाट्य, नृत्य, चित्र आदी कलांना बहर आला होता.

व्यापार-उदिम जोमात होता. गोदा-कृष्णा भरून वाहत होत्या. कोयना, जायकवाडी यासारखी धरणे मरहट्ट्यांच्या या काळ्याशार भूमीला सुजलाम-सुफलाम करीत होती. राज्याचे मराठवाडा, कोकणादी भाग नवपालवी फुटावी तसे मागासलेपणाकडून प्रगतीची वाटचाल करीत होते. कोकणी हापूसच्या चवीने परदेशाचा किनारा गाठला होता, तर नाशिकच्या दाक्षांनी फ्रेंच शॅम्पेनची चव बिघडवली होती. मॉल्स चमचमत होते, एसईझेड बहरविण्याची तयारी सुरू झाली होती.

हे राज्य आता संपूर्ण भारतवर्षाला गिळंकृत करणार की काय अशी भीती दिल्लीपतीला वाटू लागली होती. काही राज्ये घाबरून, काही आश्चर्याने तर काही आदराने ही प्रगती पाहत होती. अन्य राज्यातील प्रजेलाही आपण या प्रगतीची फळे चाखावीत असे वाटत होते. त्यासाठी लोंढेच्या लोंढे मुंबापुरी नामक या राज्याच्या राजधानीकडे लोटत होते.

मुंबापुरी कसली ती सुवर्ण नगरीच. परिसस्पर्श होऊन लोखंडाचे सोने व्हावे तसे माणसाचे येथे श्रमजीवी बनत. या नगरीत म्हणे कुणी उपाशी राहूच शकत नव्हते. ज्याला हात आहेत त्याला काम मिळत होते, ज्याच्यात जिद्द आहे, त्याची मनोकामना हे शहर पुरी करीत होते. रावाचा रंक आणि रंकाचा राव करण्याची क्षमता या नगरीची होती. या शहरात कोणत्याही सोम्यागोम्याने यावे आणि धन कमवावे असा लौकिक या शहराचा होता.

पण एके दिवशी या राज्याला दृष्ट लागली. ज्या विजेवर या राज्याचे वैभव उभे होते, ती वीजच एक दिवशी संपत आली. तिची हळूहळू टंचाई जाणवू लागली. लोकांनी खूप धडपड केली. विजेची बचत करण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यासाठी लोडशेडिंग नावाचा प्रकार सुरू केला. पण आभाळच फाटले तिथे ठिगळे तरी किती लावणार?

राज्याचे एकेक शहर अंधारात बुडू लागले. अंधाराचे हे साम्राज्य धीरेधीरे आपला फास आवळू लागले. एके दिवशी मुंबापुरीवरही हा फास आवळला गेला. सर्वत्र अंधार... या अंधारात मुंबापुरीसह महाराष्ट्र राज्य कायमचे हरवले... अजून त्याचा शोध चालू आहे.

No comments: